
पुणे, 11 एप्रिल (हिं.स.) : मायेच्या ऊबेत वाढणाऱ्या निरागस चेहऱ्यांमध्ये सत्तेचा नव्हे तर स्नेहाचा स्पर्श मिसळला की तो क्षण केवळ औपचारिक न राहता हृदयात कायमचा कोरला जातो. असाच भावनिक अनुभव महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांना पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन बालगृहातील अनाथ मुलींशी संवाद साधताना आला.
‘आपुलकीचा संवाद’ या उपक्रमांतर्गत मंत्री तटकरे यांनी बालगृहाला भेट देत मुलींशी संवाद साधला, त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले तसेच त्यांच्या इतिहासप्रेमाला मनापासून दाद दिली. संस्थेत आगमन होताच चिमुकल्या मुलींनी “ताई” म्हणत गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेला आणि पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी तटकरे म्हणाल्या की, “संस्कार आणि विचार रुजविणे आजच्या काळात कठीण झाले आहे, मात्र माईंच्या संस्थांमध्ये हे कार्य अत्यंत सुंदर पद्धतीने सुरू आहे. येथे अनाथ मुलांचे संगोपन समानता, माया आणि संस्कारांनी केले जाते, हे पाहून मनाला समाधान मिळते.”
कार्यक्रमात कु. सारिका आणि कु. पावनी यांनी पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भावस्पर्शी मनोगत व्यक्त केले. तर बालगृहातील मुलींनी सादर केलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा विशेष आकर्षण ठरला. मुलींच्या ऐतिहासिक जाणिवेचे कौतुक करताना मंत्री तटकरे भावूक झाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, “आजच्या पिढीला आपला इतिहास माहिती असणे ही अभिमानाची बाब आहे.” तसेच त्यांनी सिंधुताई सपकाळ यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत, “त्यांचा सहवास लाभलेले क्षण आयुष्यातील अमूल्य ठेवा आहेत,” असेही सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी मंत्री तटकरे यांच्या हस्ते बालगृहातील मुलींना फळवाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि तुळशीचे रोप देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला विविध मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी तसेच बालगृहातील मुली आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘आपुलकीचा संवाद’ हा उपक्रम औपचारिकतेपलीकडे जाऊन माया, आठवणी आणि संस्कारांचा भावनिक संगम ठरला.
------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु