
रायगड, 11 एप्रिल (हिं.स.)। केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त समन्वयातून दि. ९ एप्रिलपासून पुढील दोन आठवड्यांसाठी “महिला सक्षमीकरण” या विषयावर विशेष प्रसिद्धी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या प्रेरणादायी यशोगाथा समाजापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या माध्यमातून शासकीय तसेच खाजगी क्षेत्रात नाविन्यपूर्ण, उत्कृष्ट आणि इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल असे कार्य करणाऱ्या महिलांच्या कामाची दखल घेतली जाणार आहे. निवडलेल्या महिलांच्या यशकथा लेख, बातम्या, व्हिडिओ मुलाखती, सोशल मीडिया तसेच ई-बुकच्या स्वरूपात प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या परिचयातील कर्तृत्ववान महिलांची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडे लवकरात लवकर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित महिलेचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक तसेच त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची थोडक्यात माहिती ई-मेल (dioraigad@gmail.com) किंवा व्हॉट्सअॅप (7020182283) द्वारे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार संबंधित महिलांशी संपर्क साधून त्यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. समाजात सकारात्मक बदल घडविणाऱ्या महिलांच्या कार्याला व्यापक प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असून, नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)