
लातूर, 11 एप्रिल (हिं.स.) - लातूर जिल्हा वकील मंडळाच्या 2026–27 सालच्या निवडणुकीत ॲड. शिवकुमार जाधव यांच्या पॅनलने बहुमताचे वर्चस्व राखत दणदणीत विजय मिळवला. मतदानानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजता घोषित झालेल्या निकालात अध्यक्षपदी ॲड. शिवकुमार जाधव 693 मतांनी विजयी झाले.
उपाध्यक्षपदी ॲड. लहू चामे यांनी 650 मते मिळवत उल्लेखनीय विजय मिळवला. महिला उपाध्यक्षपदी ॲड. मंजुषा शिंदे (554), सचिवपदी ॲड. गुरुप्रसाद येरटे (611), सहसचिवपदी ॲड. सिद्धेश्वर धायगुडे (609), महिला सहसचिवपदी ॲड. श्रद्धा पाटील (588), ग्रंथालय सचिवपदी ॲड. अमित अर्विकर (640) तर कोषाध्यक्षपदी ॲड. नितीन राठोड (542) मतांनी निवडून आले.
या संपूर्ण प्रक्रियेत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. महेश खणगे यांनी काम पाहिले. त्यांना कर्मचारी प्रकाश मसलगे, सुशील सुरवसे आणि विष्णू जाधव यांनी सहकार्य केले. निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी अध्यक्ष योगेश जगताप यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह केला.
मैत्री आणि स्पर्धेची सुंदर परंपरा कायम
लातूर वकील मंडळाची निवडणूक प्रक्रिया नेहमीप्रमाणे यंदाही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. दैनंदिन व्यावसायिक संपर्क असूनही निवडणुकीत प्रतिस्पर्धी म्हणून लढणे आणि निकालानंतर पुन्हा मैत्री टिकवणे ही बारची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा कायम दिसून आली.
जाधव पॅनलचा एकहाती दबदबा
या निवडणुकीत ॲड. शिवकुमार जाधव यांच्या पॅनलने उपाध्यक्ष, महिला उपाध्यक्ष, सचिव, महिला सहसचिव, ग्रंथालय सचिव आणि कोषाध्यक्ष अशा सात पदांवर दणक्यात विजय मिळवला. सहसचिव पदावर मात्र सुनील शिंदे पॅनलचे ॲड. सिद्धेश्वर धायगुडे विजयी ठरले.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis