चिपळूणमधील पूर टाळण्यासाठी नालेसफाईचा धडाका
रत्नागिरी, 11 एप्रिल, (हिं. स.) : पावसाळ्यात शहरात उद्भवणारी पूरपरिस्थिती टाळण्यासाठी चिपळूण नगरपालिकेकडून नालेसफाईच्या कामाला युद्धपातळीवर सुरवात करण्यात आली आहे. आतापर्यंत शहरातील सुमारे ३५ टक्के गटारांची स्वच्छता पूर्ण झाली असून, उर्वरित कामे १५
चिपळूणमधील पूर टाळण्यासाठी नालेसफाईचा धडाका


रत्नागिरी, 11 एप्रिल, (हिं. स.) : पावसाळ्यात शहरात उद्भवणारी पूरपरिस्थिती टाळण्यासाठी चिपळूण नगरपालिकेकडून नालेसफाईच्या कामाला युद्धपातळीवर सुरवात करण्यात आली आहे. आतापर्यंत शहरातील सुमारे ३५ टक्के गटारांची स्वच्छता पूर्ण झाली असून, उर्वरित कामे १५ मेपूर्वी पूर्ण केली जाणार आहेत.

चिपळूणने २१ जुलै २०२१ रोजी महापुराचा भीषण फटका अनुभवला होता. भविष्यात तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी पालिका प्रशासनाने यंदा विशेष खबरदारी घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार ३१ मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करणे बंधनकारक असताना, पालिकेने १५ मेची अंतिम मुदत निश्चित केली आहे.

सध्या शहरातील भोगाळे, खाटीक आळी, मार्कंडी, वडनाका, पानगल्ली, भेंडीनाका, अर्बन बँक परिसर आणि गांधी चौक अशा विविध भागांत नालेसफाई व गटार स्वच्छतेचे काम वेगाने सुरू आहे.

शहरातील नाले अरुंद झाल्याने तसेच गटारे गाळाने भरल्याने पूरपरिस्थिती निर्माण होते. पालिका प्रशासनाकडून नवीन इमारतींना परवानगी देताना सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी शोषखड्डा (सोक पिट) आणि नाले काढण्याची सक्ती केली जाते; मात्र, इमारत पूर्ण झाल्यानंतर नियमांची अंमलबजावणी झाली आहे की नाही, याची खातरजमा करण्यात प्रशासन कमी पडत असल्याचा नागरिकांकडून आरोप आहे. अनेक इमारतींच्या परिसरात आजही सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी व सांडपाणी थेट रस्त्यांवर आणि गटारांत येते. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते. त्याकडे पालिकेने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande