
पुणे, 11 एप्रिल (हिं.स.)। सामाजिक परिवर्तनाची प्रयोगशाळा समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘नो डीजे’ म्हणून साजरी केली जाणार आहे. हा ऐतिहासिक निर्णय शहरातील प्रमुख दलित संघटना, उत्सव समिती आणि कार्यकर्ते, तसेच ४० विविध संघटना, मंडळांनी मिळून घेतला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत भीमसेवा प्रतिष्ठान आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी गेली २५ वर्षे सुरू असलेली स्पीकरची (डीजे) परंपरा यंदा कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी ही माहिती दिली. हा निर्णय रामभाऊ डंबाळे, रिपब्लिकन नेत्या सुवर्णा डंबाळे, सिद्धांत सुर्वे, प्रदीप कांबळे, निखिल बहुले, अविराज मराठे, नासीर खान या कार्यकर्त्यांनी एकमताने घेतला आहे. पुणे स्टेशन परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांची अलोट गर्दी लक्षात घेता, ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना त्रास होऊ नये, म्हणून इतर मंडळांनीही स्पीकर लावू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु