पुणे: सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण हाच मुख्य मार्ग- अर्जुन डांगळे
पुणे, 11 एप्रिल (हिं.स.)।शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यांचे महत्त्व अधोरेखित करत समाजपरिवर्तनासाठी फुले-आंबेडकर विचारांची आजही तितकीच गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञा
Gc


पुणे, 11 एप्रिल (हिं.स.)।शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यांचे महत्त्व अधोरेखित करत समाजपरिवर्तनासाठी फुले-आंबेडकर विचारांची आजही तितकीच गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त “महात्मा फुले यांचे कार्य आणि कर्तृत्व” या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून शोषित, वंचित आणि महिलांना सशक्त करण्याचे कार्य केले असून आजही समाजातील असमानता आणि अन्यायाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे विचार अधिकच महत्त्वाचे ठरतात, असे त्यांनी सांगितले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीजवळील पुतळ्यास कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी आणि प्रमुख पाहुणे अर्जुन डांगळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखाधिकारी सीएमए चारुशीला गायके, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख आदी मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी बोलताना अर्जुन डांगळे यांनी सामाजिक परिवर्तनासाठी केवळ धोरणे पुरेशी नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या विचारांमध्ये बदल होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक बांधिलकी घडवणारे प्रभावी माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच तरुण पिढीने फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा अभ्यास करून अन्यायाविरुद्ध सजग भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी फुले यांच्या विचारांचा अभ्यास करून ते आपल्या आचरणात आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीमुळेच खरी प्रगती साध्य होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन जाधव यांनी केले. या विशेष व्याख्यानास विद्यापीठातील विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande