
छत्रपती संभाजीनगर, ११ एप्रिल (हिं.स.) : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचे वितरण सुरू असून नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.
कांचनवाडी महसूल मंडळांतर्गत तिसगाव येथे आयोजित शिबिरात उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, अपर तहसीलदार उमेश पाटील, सरपंच शकुंतला कस्तुरे तसेच विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरात शेतकऱ्यांसाठी सातबारा उतारा, आधार कार्ड दुरुस्ती, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, रहिवासी व उत्पन्न प्रमाणपत्र, जमीन नोंदी दुरुस्ती, घरकुल योजना आणि शेती मोजणीसह विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, १ मेपासून जनगणना सुरू होणार असून नागरिकांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. तसेच प्रलंबित फेरफार दोन दिवसांत निकाली काढून अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शिबिरादरम्यान ६६९ लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. विशेष म्हणजे मराठवाडा विभागात प्रथमच शेती आणि बिगर शेती मिळकतींचे स्वतंत्र सातबारा विलगीकरण करण्यात आले. एकूण ६८ प्लॉट व भूखंडांचे स्वतंत्र सातबारे तयार करून लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.
तहसीलदार उमेश पाटील यांनी सांगितले की, स्वतंत्र सातबारा प्रक्रियेमुळे दुबार नोंदी आणि गैरप्रकारांना आळा बसेल.
यावेळी काही लाभार्थ्यांना थेट लाभही देण्यात आले. गेवराई गावातील स्मशानभूमीचा सातबारा आणि कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरची कागदपत्रे तसेच चावी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आली.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून शासकीय सेवा अधिक सुलभ झाल्याचे चित्र दिसून आले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis