
बीड, 11 एप्रिल (हिं.स.) : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देशभरात सुरू असलेले ‘संघटन सृजन अभियान’ बीड जिल्ह्यातही विविध टप्प्यांवर राबवले जात असून, हे अभियान सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
या अभियानाचा भाग म्हणून केज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केज येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गाव पातळीपर्यंत पोहोचलेल्या या अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.
या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस नीतू वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनवणे, ज्येष्ठ नेते प्रकाश भन्साळी, बाळासाहेब ठोंबरे, तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रवीण खोडसे आणि कविता कराड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान राहुल सोनवणे यांनी प्रास्ताविक करत जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राहुल सोनवणे यांच्या कार्यकाळात बीड जिल्हा काँग्रेसला नवचेतना मिळाल्याचे मत व्यक्त केले.
प्रकाश भन्साळी, प्रवीण खोडसे, कविता कराड, सिद्धेश्वर पाटील यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करत पक्ष संघटन बळकटीसाठी या अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले.------------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis