
रायगड, 11 एप्रिल (हिं.स.)। भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने साजऱ्या होत असलेल्या ‘सामाजिक समता सप्ताहा’ निमित्त गोविंद बंदर येथे ‘दलितवस्ती स्वच्छता अभियान’ उत्साहात संपन्न झाले.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वातंत्र्य व सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन करत ८ ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान राज्यभर हा सप्ताह साजरा केला जात आहे. त्याच अनुषंगाने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग कार्यालयाच्या वतीने हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.
सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेत समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, समतादूत, अलिबाग नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वांनी मिळून परिसरातील कचरा हटवून गोविंद बंदर परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमादरम्यान कार्यालय अधीक्षक माधुरी पाटील यांनी सामाजिक समता सप्ताहाचे महत्त्व स्पष्ट करत स्वच्छता आणि सामाजिक एकता या मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले.
संविधानाने दिलेल्या मूल्यांनुसार स्वच्छ व निरोगी परिसर राखणे ही देखील राष्ट्रसेवाच असल्याचे त्यांनी नमूद केले. या अभियानामुळे परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली असून, समाज कल्याण विभागाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)