
जळगाव, 11 एप्रिल (हिं.स.) शहरासह जिल्ह्याभरात उष्णतेचा तडाखा पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना मिळालेला थंडावा आणि दिलासा आता पूर्णपणे संपला असून, उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या २४ तासांत तापमानात तब्बल ३ अंशांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी जिल्ह्याचे तापमान ३६.५ अंश सेल्सिअस इतके होते. मात्र, शुक्रवारी यात झपाट्याने वाढ होऊन पारा ३८.८ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. या अचानक झालेल्या वाढीमुळे दुपारच्या वेळी उकाड्याची तीव्रता प्रचंड वाढली असून, नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या जिल्ह्यातील वातावरण अत्यंत कोरडे असून आकाश निरभ्र आहे. यामुळे सूर्यकिरणांची तीव्रता वाढली आहे. तसेच, उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या प्रभावामुळे तापमानात ही वेगाने वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस जळगाव जिल्ह्यासाठी अधिक कष्टाचे ठरू शकतात. तापमानाचा पारा ४० ते ४३ अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आणि आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारच्या वेळी अनावश्यकरीत्या घराबाहेर पडणे टाळावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. उष्णतेपासून बचावासाठी सुती कपड्यांचा वापर करावा आणि डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर