
सिन्नर, 11 एप्रिल (हिं.स.)।
तालुक्याच्या पूर्व भागातील पंचाळे - शहा रस्त्यावर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ट्रक व पिकअप यांच्यात जोरदार धडक झाली. त्यात पिकअप वाहन पेटल्याने दोन महिला व दोन पुरुष यांचा होरपळून मृत्यू झाला.
पंचाळे येथून काहीजण पिकअप गाडीने जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला गेले असल्याचे समजते. रात्री परत येत असताना पंचाळे- शहा रस्त्यावर पंचाळे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर हा भीषण
अपघात झाला. यात पंचाळे गावातील आदिवासी कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. पशुखाद्य भरलेल्या ट्रकने सुमारे १०० फूट पिकअप ओढत नेली. यात डांबरी रस्त्यावर घर्षण होऊन पिकअप पेटली असावी, असा अंदाज आहे.
पंचाळे व शिंदेवाडी ग्रामस्थांनी रात्री उशिरा मदत कार्य केले. चारही मृत सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील रहिवासी आहेत यामध्ये मयत किरण रवींद्र मोरे, वय 25 रा. पंचाळे,शुभम गणेश नवले वय 22 रा.पंचाळे, रिंकू शुभम नवले वय 19 रा.पंचाळे, मिराबाई विश्वनाथ गांगुर्डे वय 55 रा. पंचाळे यांचा समावेश आहे . यामधील शुभम आणि रिंकू यांचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता. तर जखमींमध्येजखमी सचिन गणेश नवले, सुनिता गणेश नवले राहणार पंचाळे यांचा समावेश आहे
घटनास्थळी आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV