
नांदेड, 11 एप्रिल (हिं.स.)।
नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचारी यांची दोन वर्षांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी आलेला १४ कोटी रुपयांचा निधी परत गेला असून प्राथमिक शिक्षणाधिकारी हे जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने विधीमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सर्व देयक संबंधित जिल्हा परिषद शिक्षकांच्या खात्यामध्ये करण्यात यावे अशी मागणी केली होती.
परंतु लेख विभागातील संबधित कर्मचारी यांनी शासनाकडून प्राप्त निधीचा योग्य विनियोग न केल्यामुळे थकीत देयके देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झालेला निधी परत गेला आहे. यास जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी व लेखा विभागातील कर्मचारी जबाबदार आहेत. संबधित शिक्षण विभागातील लेखा कर्मचारी यांनी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे दोन वर्षापासून प्रलंबित असलेले थकीत वेतन देयक, वैद्यकीय देयक, निवड श्रेणी देयक व इतर सर्व
देयके परत गेलेली आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांना आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत आहेत. सदर प्रकरणांची गंभीर दखल घेऊन दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने विधीमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदनावर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांत अध्यक्ष मधूकर उन्हाळे, प्रांत संघटन मंत्री सुरेश दंडवते, जिल्हाध्यक्ष व्यंकट
गंदपवाड, माध्यमिक जिल्हाध्यक्ष हंगरगे, जिल्हा कार्यवाह प्रल्हाद राठोड, विठ्ठल मुखेड, मिथून मंडलेवार, बळवंत मंगनाळे यांच्या स्वाक्षरी आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis