
सोलापूर, 11 एप्रिल (हिं.स.)। अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयाशी संलग्न शासकीय आयसीटीसी (एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र) कडून दिलेल्या कथित खोट्या एचआयव्ही अहवालामुळे सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा संसार उद्ध्वस्त झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून, न्याय न मिळाल्यास पीडित महिला तिच्या बाळासह १ मे २०२६ रोजी मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
पीडिता सुजाता विजय नलवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, १६ ऑगस्ट २०२४ रोजी अकलूज शासकीय रुग्णालयातील आयसीटीसी केंद्रात करण्यात आलेल्या तपासणीत त्यांना एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल देण्यात आला. या अहवालावर डॉ. जे. एस. नेरे यांची स्वाक्षरी व शिक्का होता. त्यानंतर त्यांना पंढरपूर येथील एआरटी सेंटरमध्ये पाठवून उपचारही सुरू करण्यात आले.
मात्र, यानंतर पीडितेने विविध शासकीय व मान्यताप्राप्त केंद्रांमध्ये तपासणी केली असता सर्वच अहवाल एचआयव्ही निगेटिव्ह आले. इंदापूर, पंढरपूर, बारामती येथील चाचण्या तसेच हिंदलॅब्स, खरघर येथे करण्यात आलेल्या अत्याधुनिक PCR चाचणीतही “एचआयव्ही-1 RNA Not Detected” असा निष्कर्ष निघाला. त्यामुळे अकलूज आयसीटीसीचा अहवाल वैद्यकीयदृष्ट्या चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या चुकीच्या अहवालामुळे पीडितेच्या वैवाहिक आयुष्यावर गंभीर परिणाम झाला. पती व सासरकडील मंडळींनी तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला घराबाहेर काढले. परिणामी, तिला लहान बाळासह माहेरी राहावे लागले असून सामाजिक बदनामी, मानसिक त्रास आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
याप्रकरणी अॅड. योगेश पवार यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, नॅकोच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एचआयव्ही पॉझिटिव्ह घोषित करण्यापूर्वी कन्फर्मेटरी टेस्ट करणे बंधनकारक असताना ती प्रक्रिया न पाळता थेट पॉझिटिव्ह अहवाल देण्यात आला. गर्भावस्थेत ‘फॉल्स पॉझिटिव्ह’ येण्याची शक्यता लक्षात न घेता निष्काळजीपणा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड