
पुणे, 11 एप्रिल (हिं.स.) । “आपल्या देशातील ६५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही २७ वर्षांखालील आहे. या निर्णायक टप्प्यावर शिक्षण, कौशल्यविकास आणि धोरणांची भूमिका भारताच्या आर्थिक व जागतिक भविष्याला दिशा देणारी ठरेल,” असे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक आणि धोरण विभागाचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी सांगितले. २०२९ पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्दिष्टाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, आज संस्था आणि धोरणकर्ते जे निर्णय घेतील ते भविष्यातील सक्षम मनुष्यबळ घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्तविद्यमाने दिनांक ९ ते ११ एप्रिल २०२६ दरम्यान सिंबायोसिस विद्यापीठाच्या लवळे कॅम्पसमध्ये स्थित्यंतरातील आंतरराष्ट्रीय शिक्षण:पद्धती, धोरणे आणि दृष्टिकोन या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत शैक्षणिक, शासकीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमधील मान्यवर सभागी झाले आहेत.
विद्यापीठाच्या सभागृहात उद्घाटन सोहळा व प्रमुख भाषण सत्र पार पडले.या सत्रात कौस्तुभ धवसे आणि डिकिन विद्यापीठाचे कुलगुरू व अध्यक्ष प्रा.आयन मार्टिन यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ.शां.ब. मुजुमदार यांनी भूषविले. याप्रसंगी असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ.विनय पाठक, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु