
छत्रपती संभाजीनगर, ११ एप्रिल (हिं.स.) : जगभर उच्च शिक्षणावर भर दिला जात असताना सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजात प्राथमिक शिक्षणाची बीजे रोवली. शिक्षणातील ज्ञानरचनावाद संकल्पनेचे खरे जनक महात्मा फुलेच आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. गोविंद नांदेडे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विजय फलारी होते. यावेळी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, महात्मा फुले प्रतिष्ठानचे संचालक डॉ. आनंद उबाळे आणि विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे उपस्थित होते.
डॉ. नांदेडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाराष्ट्रात पुरोगामी विचारधारेचे बीजारोपण महात्मा फुले यांनी केले. रुढी-परंपरांच्या जोखडात अडकलेल्या बहुजन समाजाला त्यांनी शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टीकोन देऊन बंधमुक्त केले. पुण्यासारख्या शहरात महिलांना व वंचित घटकांना शिक्षण देऊन त्यांनी समाजात मोठा बदल घडवून आणला.
महात्मा फुले यांनी १८८२ मध्ये हंटर आयोगासमोर सादर केलेले निवेदन हे बहुजन समाजाच्या विचारांचा जाहीरनामाच असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढे राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फुले यांच्या विचारधारेचा वारसा पुढे नेला, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात डॉ. आनंद उबाळे यांनी महात्मा फुले यांची विचारधारा ही मानवमुक्तीचा जाहीरनामा असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. युवराज सूतार यांनी केले, तर प्रा. विठ्ठल चोपडे यांनी आभार मानले.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. विजय फलारी यांनी सांगितले की, महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षणासोबतच उद्योग आणि तांत्रिक कौशल्यांचा संगम घडवून आणण्यावर भर दिला. त्यांच्या विचारांचा प्रभाव नवीन शैक्षणिक धोरणात दिसून येतो, ज्यामध्ये इंटर्नशिप आणि ऑन-जॉब ट्रेनिंगला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis