पुण्यात ‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत क्रीडा प्रतिभा शोध मोहीम; १५ व १६ एप्रिलला निवड चाचणी
पुणे, ११ एप्रिल (हिं.स.) : राज्यातील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात क्रीडा प्रतिभा विकास केंद्र सुरू करण्यात येत आहे. या केंद्रासाठी पात्र खेळाडूंची निवड चाचणी १५
पुण्यात ‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत क्रीडा प्रतिभा शोध मोहीम; १५ व १६ एप्रिलला निवड चाचणी


पुणे, ११ एप्रिल (हिं.स.) : राज्यातील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात क्रीडा प्रतिभा विकास केंद्र सुरू करण्यात येत आहे. या केंद्रासाठी पात्र खेळाडूंची निवड चाचणी १५ व १६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश क्रीडा प्रशिक्षण व्यवस्थेला बळकट करणे असून, त्यामध्ये पायाभूत सुविधा विकास, स्पर्धांचे आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार तसेच करिअर मार्गदर्शन अशा विविध घटकांचा समावेश आहे. खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी देशी व विदेशी संस्थांचा सहयोगही घेतला जाणार आहे.

‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत ॲथलेटिक्स, हॉकी, शूटिंग आणि रोईंग या चार क्रीडा प्रकारांसाठी पुणे जिल्हा स्तरावर केंद्राला मान्यता देण्यात आली आहे. प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी २० खेळाडूंची निवड होणार असून, २५ वर्षांखालील महाराष्ट्रातील खेळाडूंना अर्ज करता येणार आहे.

निवड प्रक्रिया खेळाडूंच्या मागील दोन वर्षांतील कामगिरीवर आधारित असेल. राज्यस्तरीय पदकप्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावरील (SGFI, AITA, Khelo India National) स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या खेळाडूंना प्राधान्य दिले जाणार आहे.

ॲथलेटिक्स, हॉकी आणि शूटिंग या क्रीडा प्रकारांसाठी निवड चाचणी १५ व १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी (वेटलिफ्टिंग हॉल), पुणे येथे होणार आहे. तर रोईंगसाठी चाचणी आर्मी रोईंग नोड, सी.एम.ई., दापोडी येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

इच्छुक खेळाडूंनी dsopune6@gmail.com

या ई-मेलवर अर्ज सादर करावा. अर्जासोबत जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच पालकांचे संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १३ एप्रिल २०२६ असून, निवड चाचणीच्या दिवशी सर्व मूळ कागदपत्रे, त्यांच्या सत्यप्रती आणि तीन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणणे बंधनकारक आहे.

अधिक माहितीसाठी श्री. सुरेश काकड, श्रीमती मनीषा माळी व श्रीमती अश्विनी हत्तरगे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande