
बीड, 11 एप्रिल (हिं.स.) :विकसित भारताचे 2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी युवा लोकप्रतिनिधींनी कृषी आणि शिक्षण क्षेत्रात तांत्रिक क्रांतीची सांगड घालत सक्रिय भूमिका बजावावी, असे प्रतिपादन आमदार नमिता मुंदडा यांनी केले.
राष्ट्रकुल संसदीय संघ (सीपीए) भारत क्षेत्र, विभाग 8 च्या पश्चिम विभागीय परिषदेत गोवा येथे त्या बोलत होत्या. ‘विकसित भारत–2047’ या विषयावर आपले विचार मांडताना त्यांनी देशातील 65 टक्के तरुण लोकसंख्या ही भारताची खरी ताकद असल्याचे अधोरेखित केले. या सत्राला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मुंदडा यांनी कृषी क्षेत्रातील युवा सहभागावर विशेष भर दिला. ग्रामीण भागात 70 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असूनही त्या क्षेत्रात प्रामुख्याने ज्येष्ठ पिढीच सक्रिय असल्याचे त्यांनी नमूद केले. शहरांकडे वाढणारा तरुणांचा कल लक्षात घेता, शेतीमध्ये तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा प्रभावी वापर करून तरुणांना पुन्हा कृषी क्षेत्राकडे आकर्षित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन तंत्रज्ञान आणि विविध ॲप्सच्या माध्यमातून शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी तरुण लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शिक्षण क्षेत्रातील बदलांवर भाष्य करताना त्यांनी पारंपरिक पाठांतरापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शिकवण्याची गरज अधोरेखित केली. चॅटजीपीटीसारख्या साधनांच्या युगात केवळ माहिती मिळवण्यापेक्षा त्याचा योग्य उपयोग कसा करायचा हे विद्यार्थ्यांना शिकवणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच सामाजिक व संवाद कौशल्ये लोकशाही बळकटीसाठी महत्त्वाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis