पुण्यातील शिवाजीनगर स्थानकाला लवकरच प्रारंभ
पुणे, 11 एप्रिल (हिं.स.)शिवाजीनगरमधील एसटी स्थानकाच्या जागेवर खासगी-सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) संकुल उभारणार असून, त्याबाबत एसटी महामंडळाशी करार होणार आहे. त्यानंतर कामाला प्रारंभ होईल. त्यात मेट्रोबरोबरच एसटी बसस्थानकही असेल, तसेच पीएमपीच्या थ
पुण्यातील शिवाजीनगर स्थानकाला लवकरच प्रारंभ


पुणे, 11 एप्रिल (हिं.स.)शिवाजीनगरमधील एसटी स्थानकाच्या जागेवर खासगी-सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) संकुल उभारणार असून, त्याबाबत एसटी महामंडळाशी करार होणार आहे. त्यानंतर कामाला प्रारंभ होईल. त्यात मेट्रोबरोबरच एसटी बसस्थानकही असेल, तसेच पीएमपीच्या थांब्यांसाठीही जागा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील मेट्रोच्या विस्तारित मार्गांसाठी वेगाने प्रक्रिया सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एसटी स्थानकाबाबत एसटी महामंडळाशी चर्चा झाली आहे. करार झाल्यावर आराखडा निश्चित होऊन पुढील प्रक्रिया मार्गी लागेल, असेही हर्डीकर यांनी नमूद केले. मेट्रोच्या विस्तारित मार्गांची माहिती देताना ते म्हणाले, ‘‘वनाज-चांदणी चौक आणि रामवाडी-वाघोली (विठ्ठलवाडी) मेट्रो मार्गांसाठी काम सुरू झाले आहे. वनाज-चांदणी चौक मार्गासाठी काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. रामवाडी-वाघोली मार्गातील काही भाग महाराष्ट्र विकास पायाभूत महामंडळ आणि महामेट्रो संयुक्तपणे करणार आहे. त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे.’’ खराडी ते खडकवासला आणि नळस्टॉप, वारजे, माणिकबाग मार्गासाठी खासगी आणि शासकीय जागेचे भूसंपादन करण्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचेही हर्डीकर यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande