
पुणे, 11 एप्रिल (हिं.स.)हवामान बदल आणि निकृष्ट खतांमुळे संकटात सापडलेल्या आंबा-काजू उत्पादकांना तातडीने नुकसानभरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.
कोकणातील आंबा बागायतदारांच्या तक्रारींनुसार कृषी आयुक्तालयात आयोजित बैठकीनंतर शेट्टी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सरकारने जाहीर केलेली २२० रुपये भरपाई ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. ८० ते ९० टक्के उत्पादन घटल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निकृष्ट खते व कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. कारवाई न झाल्यास १८ एप्रिलला रत्नागिरीत होणाऱ्या सभेत कंपन्यांना एक रुपयाही न देण्याचा आणि त्यांना कोकणात व्यवसाय करू न देण्याचा निर्णय घेतला जाईल.’’
या बैठकीला निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर, राज्याचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रदीप देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले, कीटकशास्त्रज्ञ डॉ. विजय देसाई, आंबा उत्पादकांचे प्रतिनिधी गणेश गावकर, सुशांत नाईक, दीपक कदम, सुजित चौकेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्वस्तिक पाटील आदी उपस्थित होते. बैठकीत द्राक्षाप्रमाणेच आंब्यासाठीही ‘पीक संरक्षण वेळापत्रक’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे अनावश्यक निविष्ठांचा वापर टाळता येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु