
अक्कलकोट, 11 एप्रिल (हिं.स.) : सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी नुकतीच अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले. जिल्हाधिकारी पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी स्वामी चरणी लीन होऊन आशीर्वाद घेतले आणि देवस्थान समितीच्या सेवाकार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद आणि प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी महेश इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवास आणि ऐतिहासिक पारंपारिक पालखी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी देवस्थान समितीची भक्ती, सेवा आणि विविध उपक्रम पाहून आपण धन्य झाल्याचे मनोगत व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड