सोलापूरमध्ये १०,६०० मेट्रिक टन खत साठा; बफर स्टॉक १०० टक्के ठेवण्याचे आदेश
सोलापूर, ११ एप्रिल (हिं.स.) : खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यासाठी एकूण १० हजार ६०० मेट्रिक टन खतांचा संरक्षित साठा निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये ९ हजार ३५० मेट्रिक टन युरिया आणि १ हजार २५० मेट्रिक टन डीएपीचा समावेश आहे. हा सा
Collctor


सोलापूर, ११ एप्रिल (हिं.स.) : खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यासाठी एकूण १० हजार ६०० मेट्रिक टन खतांचा संरक्षित साठा निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये ९ हजार ३५० मेट्रिक टन युरिया आणि १ हजार २५० मेट्रिक टन डीएपीचा समावेश आहे. हा साठा १०० टक्के उपलब्ध ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा कृषी विकास अधिकारी हरी हावळे, जिल्हा विपणन अधिकारी मनोज वाजपेयी तसेच विविध खत कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले की, मागील वर्षी खत कंपन्यांनी केवळ ५४ टक्के बफर स्टॉक राखला होता, ज्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी पुणे येथील कृषी आयुक्तालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला संपूर्ण साठा सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.

खत कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत साठ्यात कमतरता होऊ देऊ नये, तसेच वितरण प्रक्रियेत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी दिला.

या बैठकीमुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande