सोलापूरच्या हवाई सेवांना चालना; ‘फ्लाय ९१’कडून नवीन मार्गांच्या संकेत
सोलापूर, ११ एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने शहरातील हॉटेल लोटस येथे आयोजित विशेष बैठकीत सोलापूरच्या औद्योगिक व व्यावसायिक विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. या बैठकीत बाघेश्वर यादव, जनरल मॅनेजर (से
olkuh


सोलापूर, ११ एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने शहरातील हॉटेल लोटस येथे आयोजित विशेष बैठकीत सोलापूरच्या औद्योगिक व व्यावसायिक विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. या बैठकीत बाघेश्वर यादव, जनरल मॅनेजर (सेल्स), फ्लाय ९१ एअरलाईन्स यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.

या प्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य व सिव्हिल एव्हिएशन समितीचे को-चेअरमन केतनभाई शहा, तसेच गव्हर्निंग सदस्य संजीव पाटील यांच्यासह सोलापूर विकास मंचाचे सदस्य, विविध क्षेत्रांतील उद्योजक, संस्था व संघटनांचे पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘चाय पे चर्चा’ या बैठकीदरम्यान फ्लाय ९१ एअरलाईन्सच्या प्रतिनिधींनी सोलापूर ते गोवा आणि हैदराबाद या विमानसेवांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल नागरिकांचे आभार मानले. तसेच भविष्यात आणखी नवीन मार्ग सुरू करण्याबाबत सकारात्मक संकेत देण्यात आले.

या बैठकीत आयएमएच्या अध्यक्षा डॉ. मंजुषा शहा, डॉ. मिलिंद शहा, चिंचोळी एमआयडीसीचे उपाध्यक्ष सूत्रावे, विकास मंचाचे योगीन गुज्जर, विजय यादव, दत्ता अंबुरे, झाम्बरे तसेच जिल्ह्यातील तिकीट एजंट्स, सोलापूर चेंबरचे पदाधिकारी आणि चादर-टॉवेल निर्यातदार व व्यापारी उपस्थित होते.

या चर्चेमुळे सोलापूरच्या हवाई संपर्कात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सोलापूर विमानतळ ‘उड्डाण’ योजनेअंतर्गत सुरू झाल्यास तिकीट दर मोठ्या प्रमाणात कमी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री, खासदार आणि पालकमंत्री यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

उपस्थितांच्या मते, हवाई सेवांचा विस्तार झाल्यास सोलापूरच्या उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande