
बीड, 11 एप्रिल (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची खरी संख्या निश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. १४, १५ आणि २२ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सुमारे २,५०० हून अधिक शाळांची प्रत्यक्ष पटपडताळणी केली जाणार आहे.
यामध्ये ६० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळांना या प्रक्रियेतून वगळण्यात आले असून, खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांची १०० टक्के पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या या अचानक जाहीर झालेल्या मोहिमेमुळे बोगस पटसंख्या दाखवून शिक्षक पदे टिकवणाऱ्या शाळांचे धाबे दणाणले आहेत. पटसंख्या कमी आढळल्यास संबंधित शिक्षक पदे धोक्यात येण्याची शक्यता असल्याने अनुपस्थित विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी शिक्षकांची मोठी धावपळ सुरू आहे. जिल्हास्तरावरून १०० पथके या तपासणीसाठी तैनात करण्यात आली असून विद्यार्थ्यांची वर्गात जाऊन प्रत्यक्ष शिरगणती केली जाईल.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis