
कोल्हापूर, 11 एप्रिल : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले. इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कोल्हापूर यांच्या वतीने कंदलगाव येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. प्रमुख वक्त्या डॉ. मंजुश्री पवार यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेत शिक्षणाचा प्रसार, स्त्री-पुरुष समानता आणि शेतकरी हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांना सामाजिक भान जपण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास सहायक संचालक सुनिता नेर्लीकर, अधिकारी अमित घवले, तसेच दिगंबर लोहार, शितल मंडपे, अनिल खडके, मोहन हजारे, एकनाथ कुंभार, संजयबाबा करपे यांच्यासह कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप अमित घवले यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
सामाजिक न्याय विभागातर्फे बिंदू चौक येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्व. बी. जी. खराडे महाविद्यालयाच्या वतीने मुलींची रॅली काढण्यात आली. या रॅलीत पालखीत विविध ग्रंथ ठेवून महात्मा फुले पुतळा ते राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ असा मार्ग पार करण्यात आला.
कार्यक्रमास संभाजी पवार, सचिन पाटील, गणी आजरेकर, आलोक जत्राटकर, विजय देवणे, डी. जी. भास्कर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
कोल्हापूर प्रेस क्लबमध्येही महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले.दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल येथील गैबी चौकात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांनाही अभिवादन केले. या प्रसंगी विवेक लोटे, बच्चन कांबळे, रुपेश वाघमारे, अभिजित कांबळे, अंकुश कांबळे, सागर शिंदे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar