
लातूर, 11 एप्रिल (हिं.स.)। हिंगोली जिल्ह्यात आज (दि. ११) सकाळी ०८:४५ वाजता रिश्टर स्केलवर ४.७ तीव्रतेचा हलका ते मध्यम स्वरूपाचा भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. या भूकंपाचे केंद्र १९.५३३ उत्तर अक्षांश व ७७.२०२ पूर्व रेखांश येथे असून, त्याची खोली १० किलोमीटर इतकी नोंदवण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा लातूर जिल्ह्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम झालेला नाही. कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत.
तथापि, नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि भूकंपाच्या वेळी घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. इमारतीत असल्यास मजबूत फर्निचरखाली आसरा घ्यावा, लिफ्टचा वापर टाळावा तसेच मोकळ्या जागेत असल्यास इमारती, झाडे आणि वीज तारा यांपासून दूर राहावे, असे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
भूकंपानंतर इमारतींमध्ये तडे किंवा नुकसान आढळल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, कोणतीही आपत्कालीन घटना आढळल्यास तात्काळ कळविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis