
कोल्हापूर, 11 एप्रिल (हिं.स.)। पंचगंगा नदीवरील बास्केट ब्रिज, शिरोली ते उचगावपर्यंतचा पुल, सातारा ते कागल महामार्गाचे सहा पदरीकरण अशा महामार्गाशी निगडीत विविध विषयांबद्दल आज खा. धनंजय महाडिक यांनी आढावा बैठक घेतली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मंजूर झालेली सर्व कामे ठरलेल्या वेळेत आणि दर्जेदार पध्दतीने पूर्ण झाली पाहीजेत, असे खासदार महाडिक यांनी बजावले.
सातारा ते कागलपर्यंतच्या महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम प्रचंड रेंगाळले आहे. दुसरीकडे पंचगंगा नदीवरील बास्केट ब्रिज, शिरोली ते उचगावपर्यंतचा पिलरवरचा पुल, कागलजवळील लक्ष्मी टेकडीजवळचा उड्डाण पुल अशा विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आज खासदार धनंजय महाडिक यांनी आढावा बैठक घेतली. त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, गोविंद प्रसाद, महापालिकेचे उपअभियंता सुरेश पाटील उपस्थित होते. खासदार महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून आणलेल्या बास्केट ब्रिजची उभारणी पुढील अडीच वर्षात होणे अपेक्षित आहे. त्यातून कोल्हापुरात प्रवेश करताना, प्रशस्त आणि सौंदर्यपूर्ण रस्ता मिळणार आहे. तर शिरोली ते उचगाव आणि कागलजवळ होणार्या उड्डाण पुलाचे काम येत्या तीन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या शहरातून जाणार्या उड्डाण पुलाचा आराखडा आणि तांत्रिक सल्लागारांची नियुक्त याबद्दलही खा. धनंजय महाडिक यांनी माहिती घेवून सुचना केल्या. तर रत्नागिरी ते सोलापूर या मार्गाचे किती टक्के काम पूर्ण झाले आहे आणि सर्व काम कधी पूर्ण होईल, याबद्दलही आजच्या बैठकीत चर्चा झाली. चोकाक ते रत्नागिरी या रस्त्याची सद्यस्थिती, शिवाजी पुल ते केर्ले फाटा रस्त्याचे रूंदीकरण, पेठनाका ते कागलपर्यंतच्या रस्त्याचे रूंदीकरण आणि सातारा ते कागलपर्यंतच्या रस्त्याचे सहापदरीकरणाचे काम गतीने पूर्ण व्हावे. प्रत्येक काम दर्जेदार असावे, अशी सूचना खासदार महाडिक यांनी केली. याशिवाय कोल्हापूर जिल्हयात सुरू असलेल्या कामांमध्ये येणार्या अडचणी, गरजा याबद्दलही खासदार महाडिक यांनी अधिकार्यांकडून माहिती घेवून आवश्यक त्या सुचना केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar