
अमरावती, 12 एप्रिल (हिं.स.)।कुस्तीचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने अचलपूरचा हनुमान आखाडा तसेच विदर्भ कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने अचलपूर येथे पालकमंत्री चषक विदर्भ केसरी कुस्तीचा डाव रंगणार आहे. १६, १७ व १८ एप्रिल रोजी आयोजित स्पर्धेत विविध जिल्ह्यांमधून जवळपास ३०० पैलवान तसेच २५ रेफरी सहभागी होणार आहेत. अचलपूरच्या नगराध्यक्ष रूपाली माथने यांनी या स्पर्धेच्या आयोजनात पुढाकार घेतला आहे. आयोजनाबाबत नगराध्यक्ष माथने तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी सांगितले की, अचलपूर येथील तहसील रोडवरील विठ्ठलवाडी मैदानावर कुस्तीचे सामने रंगणार आहेत.
पुरुष व महिलांच्या गटात सामने होणार असून १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता स्पर्धेचे उद्घाटन रामदास तडस, आमदार प्रवीण तायडे, कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. संजय तीरथकर, प्रभुदास भिलावेकर, नगराध्यक्ष रूपाली माथने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. विदर्भातील ११ जिल्हे आणि चार महापालिका क्षेत्रातील १५ संघांतील कुस्तीगीर या स्पर्धेत सहभागी होत आहेत. विदर्भ केसरीचा बहूमान मिळविणाऱ्या कुस्तीपटूला रोख रक्कम, चांदीची गदा, पदक तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय द्वितीय व तृतीय क्रमांकावरील पैलवानाला सुद्धा रोख रक्कम व दुचाकी भेट दिली जाणार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रम पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रामदास तडस तसेच आमदार राजेश वानखडे यांच्या हस्ते होईल. कुमार गट, पुरुष गट, प्रौढ गट तसेच महिला गटात या कुस्ती होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस म्हणाले की, आगामी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये विदर्भाचा कुस्तीगीर चमकावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशिक्षकासोबतच कुस्तीपटूंना लागणाऱ्या इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न विदर्भ कुस्तीगीर संघाकडून करण्यात येत आहेत.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी