पीएसएलकडून झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानीवर २ वर्षांची बंदी
लाहोर, १४ एप्रिल (हिं.स.): पाकिस्तान सुपर लीग सोडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याच्या निर्णयामुळे, झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानीवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. मुझारबानी सुरुवातीला आयपीएल आणि पीएसएल या दोन्ही लिलावांमध्ये
ब्लेसिंग मुझारबानी


लाहोर, १४ एप्रिल (हिं.स.): पाकिस्तान सुपर लीग सोडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याच्या निर्णयामुळे, झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानीवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. मुझारबानी सुरुवातीला आयपीएल आणि पीएसएल या दोन्ही लिलावांमध्ये विकला गेला नाही. त्यानंतर इस्लामाबाद युनायटेडने त्याला बदली क्रिकेटपटू म्हणून करारबद्ध केले. पण, नंतर जेव्हा कोलकाता नाईट रायडर्सने त्याला करार देऊ केला, तेव्हा त्याने आपला करार सोडून दिला. बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानसोबतचा करार संपुष्टात आणल्यानंतर कोलकाता संघाने त्याला करारबद्ध केले होते.

मुझारबानीने आतापर्यंत आयपीएल २०२६ मध्ये दोन सामने खेळले असून, आपल्या दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चार विकेट्स घेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. यापूर्वी, अशाच एका प्रकरणात दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू कॉर्बिन बॉशवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती.

इतर क्रिकेटपटूंवरही कारवाई होऊ शकते. या हंगामात स्पेन्सर जॉन्सन आणि दासुन शनाका यांनीही पीएसएल सोडून आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी, त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

पीएसएलने म्हटले आहे की, फ्रँचायझी क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणि शिस्त आवश्यक आहे. विद्यमान करार असताना दुसऱ्या लीगमध्ये सामील होणे हे नियमांचे उल्लंघन आहे आणि त्यामुळे व्यवस्थेवरील विश्वास कमी होतो. पीएसएलने स्पष्ट केले की दोन वर्षांची बंदी या उल्लंघनाचे गांभीर्य दर्शवते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande