
नवी दिल्ली, 14 एप्रिल (हिं.स.)काही वर्षांपूर्वी, महान फिरकीपटू शेन वॉर्नच्या निधनाने क्रिकेट जगताला धक्का बसला होता. वरवर पाहता निरोगी असलेल्या त्याच्या निधनाच्या बातमीवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. पण आता, या फिरकीपटूच्या निधनानंतर जवळपास चार वर्षांनी त्याच्या मुलाने एक धक्कादायक विधान केले आहे. जॅक्सनने दावा केला आहे की, वॉर्नचा मृत्यू त्याने घेतलेल्या तीन-चार कोविड लसींमुळे झाला असावा. कामासाठी वॉर्नला त्या लसी घेणे भाग पडले होते. एका पॉडकास्टवर बोलताना, जॅक्सनने हे देखील कबूल केले की त्याच्या वडिलांना आधीपासूनच आरोग्याच्या समस्या होत्या. २०२२ मध्ये थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५२ व्या वर्षी वॉर्नचे निधन झाले.
जॅक्सन म्हणाला, मला नक्कीच वाटतं की (कोविड लसीने) यात भूमिका बजावली आहे. आता असं म्हणणं वादग्रस्त ठरेल असं मला वाटत नाही. बाबांना आधीपासूनच आरोग्याची समस्या असली तरी, मला वाटतं की त्यामुळे ती समस्या अगदी समोर आली. ही एक अशी गोष्ट आहे, ज्याच्याशी मी नेहमीच झगडत आलो आहे.
तो म्हणाला, वॉर्नच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया तात्काळ सरकारला दोष देण्याची होती. मी लगेच कोविड आणि लसीला दोष दिला. अगदी श्रद्धांजली सभेदरम्यानसुद्धा, माझ्या भावना व्यक्त करण्यापासून स्वतःला रोखणे मला जवळजवळ अशक्य झाले होते. जॅक्सन पुढे म्हणाला, कदाचित तसे न करणेच शहाणपणाचे होते. जर मी तसे केले असते, तर आज माझी परिस्थिती खूप वेगळी असती, पण त्यावेळी मला तसे वाटले होते. हो, त्याआधीही अनेक लोक हृदयविकाराच्या झटक्याने मरत होते. पण बाबा ठीक होते. मला वाटते त्यांनी लसीचे तीन-चार डोस घेतले होते. त्यांना ते घ्यायचे नव्हते, पण इतर सर्वांप्रमाणेच त्यांनाही ते घेण्यास भाग पाडले गेले.
वॉर्नचा मुलगा म्हणाला, मी त्याबद्दल जास्त विचार न करण्याचा प्रयत्न करतो, कारण त्यामुळे राग वाढतो. आणि तो राग कोणासाठीही चांगला नाही. आपल्या वडिलांच्या जीवनशैलीचे वर्णन करताना जॅक्सन म्हणाला की, धूम्रपान आणि मद्यपान करूनही त्यांची दैनंदिन दिनचर्या तुलनेने निरोगी होती. तो म्हणाला, बाबा त्यावेळी निरोगी आणि आनंदी होते. बऱ्याच काळानंतर ते इतके चांगले दिसत होते. हो, ते धूम्रपान आणि मद्यपान करायचे, पण ८० आणि ९० वर्षांचे अनेक लोक बाबांपेक्षा जास्त धूम्रपान आणि मद्यपान करतात. वॉर्नला त्याच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी, २०२१ मध्ये इंग्लंडमधील 'द हंड्रेड' स्पर्धेदरम्यान प्रशिक्षण देत असताना कोविडची लागण झाली होती. पण, त्याच्या आकस्मिक मृत्यूआधी तो कोणत्याही मोठ्या आजाराशी झुंज देत असल्याचे ज्ञात नव्हते..
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे