
सायप्रस, 12 एप्रिल (हिं.स.)भारतीय महिला ग्रँडमास्टर आर. वैशालीने या स्पर्धेतील सर्वात निर्णायक कामगिरीपैकी एक करत, काळ्या मोहऱ्यांसह खेळताना अलेक्झांड्रा गोर्याचकिनाला पराभूत केले आणि '२०२६ फिडे महिला कॅंडिडेट्स' स्पर्धेवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. या स्पर्धेतील वैशालीचा हा चौथा विजय आहे आणि गेल्या सहा फेऱ्यांमधील चौथा विजय तिला ११ डावांमधून ७ गुणांपर्यंत घेऊन गेला. यामुळे प्रतिस्पर्ध्यांवर १ गुणाची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली आहे.
गोर्याचकिनासाठी हा पराभव तिच्या विजेतेपदाच्या आशांना बसलेला जवळपास 'प्राणघातक' धक्का ठरला आहे. यामुळे ती पाच गुणांवरच अडकून पडली असून, आघाडीवर असलेल्या खेळाडूच्या तुलनेत ती दोन गुणांनी मागे आहे. वैशालीच्या या आगेकूचीला इतरत्र लागलेल्या निकालांचीही मदत झाली. तिची सर्वात जवळची प्रतिस्पर्धी असलेल्या ॲना मुझीचुक आणि झू जिनर या दोघींना अनुक्रमे कॅटेरिना लागनो आणि दिव्या देशमुख यांनी बरोबरीत रोखले. आता केवळ काही फेऱ्या बाकी असताना, स्पर्धेची गती पूर्णपणे वैशालीच्या बाजूने झुकली आहे. ती आता एका ऐतिहासिक यशाच्या उंबरठ्यावर उभी आहे.
खुल्या गटात, जावोखिर सिंदारोव्ह अव्वल स्थानी आपले वर्चस्व कायम राखून आहे. ११ वी फेरी एका दुर्मिळ अशा 'स्टेलमेट'मध्ये संपली. या फेरीतले प्रत्येकच डावाचा निकाल बरोबरीने लागला. सिंदारोव्हने अत्यंत शांतपणे फाबियानो कारुआनाला बरोबरीत रोखले आणि केवळ तीन फेऱ्या बाकी असताना आपली दोन गुणांची आघाडी कायम राखली आहे.
आर. प्रज्ञानानंद हा बरोबरीची कोंडी फोडण्याच्या सर्वात जवळ पोहोचला होताय पण मॅथियास ब्लूबाउमविरुद्ध त्याला विजयात रूपांतर करता आले नाही. अनिश गिरीलाही आंद्रे एसिपेंकोविरुद्ध मिळालेल्या एका आशादायक स्थितीचा फायदा उठवता आला नाही, तर हिकारू नाकामुरा आणि वेई यी यांनी आपापले डाव लवकरच बरोबरीत संपवण्यावर समाधान मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे