
बीजिंग, 12 एप्रिल (हिं.स.)भारतीय बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीला आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात चीनच्या शी युकीने त्याला २१-८, २१-१० असे पराभूत केले. हा सामना ४२ मिनिटे चालला. पराभव होऊनही, आयुषने इतिहास रचला आहे.
आयुष बॅडमिंटनमध्ये भारताचा नवा बॅडमिंटनपटू म्हणून उदयास आला आहे. गेल्या 61 वर्षांत या स्पर्धेच्या एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय आणि एकूण इतिहासातील दुसरा भारतीय ठरला आहे. दिनेश खन्ना यांनी १९६५ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आयुषला इतिहासाची पुनरावृत्ती करता आली नाही, पण त्याने रौप्यपदक नक्कीच मिळवले. गेल्या 61 वर्षांत या स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये पदक जिंकणारा तो दुसरा भारतीय आहे. एच. एस. प्रणॉयने २०१८ मध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते. या स्पर्धेत भारताला शेवटचे पदक २०२३ मध्ये मिळाले होते. सात्विक आणि चिराग यांनी पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते.
जागतिक क्रमवारीत २५ व्या क्रमांकावर असलेल्या आयुषचे अंतिम फेरीत पोहोचणे हा योगायोग नसून, त्याच्या कठोर परिश्रमाचे आणि दृढनिश्चयाचे फळ आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याने जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या जोनाथन क्रिस्टीचा २३-२१, २१-१७ असा पराभव केला. तसेच त्याने चायनीज तैपेईच्या चिन यू जेन आणि चीनच्या ली शी फेंग यांसारख्या बलाढ्य बॅडमिंटनपटूंनाही पराभूत केले. उपांत्य फेरीत आयुषने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या कुनलावुत विटिडसर्नचा १०-२१, २१-१९, २१-१७ असा पराभव केला. हा सामना ७५ मिनिटे चालला आणि पहिला सेट गमावूनही या भारतीय बॅडमिंटनपटूने दबावाखाली उत्कृष्ट कामगिरी केली होती
या स्पर्धेत इतर स्टार भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी निराशाजनक ठरली. पीव्ही सिंधू दुसऱ्या फेरीत, तर लक्ष्य सेनचे पहिल्या फेरीतच आव्हान संपुष्टात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे