
नवी दिल्ली, 13 एप्रिल (हिं.स.)दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९२ वर्षांच्या होत्या. संगीत आणि क्रिकेटशी त्यांचे घनिष्ठ नाते होते. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्याने त्यांच्यासोबत घालवलेल्या खास क्षणांच्या आठवणींना उजाळा देत इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. लीने लिहिले, मला २००६ मध्ये आशा भोसले यांच्यासोबत 'यू आर द वन फॉर मी' हे गाणे लिहिण्याची आणि रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली होती. हे माझ्यासाठी नेहमीच खूप खास राहील आणि मी त्यासाठी नेहमीच कृतज्ञ राहीन.
ब्रेट लीने केवळ आशा भोसले यांच्या गायनाचीच नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचीही प्रशंसा केली. तो म्हणाला, केवळ त्यांची विलक्षण प्रतिभाच नव्हे, तर त्यांचा साधेपणा आणि नम्रताही माझ्या मनात कायम राहिली. एवढ्या महान गोष्टी साध्य करूनही, त्या अत्यंत आपुलकीने आणि उदारतेने वावरत होत्या.
आपल्या संदेशाचा समारोप करताना, ब्रेट लीने आशा भोसले यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना शोक व्यक्त केला आणि त्यांचा वारसा अमर असल्याचे म्हटले. त्यांनी लिहिले, या कठीण काळात माझे विचार त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत आहेत. अशा एका विशेष व्यक्तीसोबत काही वेळ घालवण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो... यात शंका नाही की त्यांचा वारसा येणाऱ्या पिढ्यांपर्यंत जिवंत राहील.
ब्रेट ली आणि आशा भोसले यांचे नाते केवळ आदरापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी २००७ मध्ये प्रदर्शित झालेले 'यू आर द वन फॉर मी' हे गाणे संगीतबद्धही केले होते. हे गाणे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान एका जागतिक संगीत प्रकल्पाचा भाग होते आणि प्रचंड गाजले. या सहयोगाने क्रिकेट आणि संगीताच्या अनोख्या संगमाचे उत्तम उदाहरण सादर केले. नंतर, जेव्हा ते दोघे सिडनी ऑपेरा हाऊसमध्ये भेटले, तेव्हा आशा भोसले यांनी ब्रेट लीला एक स्वाक्षरी केलेला अल्बम भेट दिला, जो त्यांचा साधेपणा आणि उदारपणा दर्शवत होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे