आयपीएल 2026 : बंगळुरुचा मुंबईवर ‘रॉयल‘ विजय, रदरफोर्डची एकाकी झुंज व्यर्थ
मुंबई, 13 एप्रिल (हिं.स.)रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने मुंबई इंडियन्सला १८ धावांनी पराभूत केले. वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, फिल सॉल्ट, रजत पाटीदार आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीने २० षटकांत चार विके
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा संघ


मुंबई, 13 एप्रिल (हिं.स.)रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने मुंबई इंडियन्सला १८ धावांनी पराभूत केले. वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, फिल सॉल्ट, रजत पाटीदार आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीने २० षटकांत चार विके्ट्स गमावून २४० धावा केल्या. मुंबई इंडियन्सला आपल्या निर्धारित षटकांत पाच विकेट्स गमावून केवळ २२२ धावाच करता आल्या आणि त्यांना सामना गमवावा लागला. संघासाठी शेर्फेन रदरफोर्डने नाबाद ७१ धावा केल्या.

या विजयामुळे आरसीबी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. चार सामन्यांतून तीन विजयांसह त्यांचे सहा गुण असून, त्यांचा नेट रन रेट +१.१४८ आहे. दुसरीकडे, चार सामन्यांत तीन पराभव झाल्यामुळे मुंबई इंडियन्स -०.७७२ च्या नेट रन रेटसह आठव्या स्थानावर घसरली आहे. गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचे वर्चस्व असून, पंजाब किंग्स दुसऱ्या स्थानावर आहे.आरसीबीने ठेवलेल्या २४१ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केली. रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा ही जोडी चांगल्या लयीत दिसत होती. पण हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित १९ धावा करून रिटायर्ड हर्ट झाला आणि पुन्हा फलंदाजीसाठी परतला नाही. रिकेल्टनने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २२ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवला मिळालेल्या चांगल्या सुरुवातीचा फायदा उचलता आला नाही आणि तो २२ चेंडूंमध्ये ३३ धावा करून बाद झाला. तिलक वर्मालाही फलंदाजीत फारसा प्रभाव पाडता आला नाही आणि त्याने केवळ एक धाव काढली.हार्दिक पांड्याने काही जोरदार फटके मारले आणि तो जेकब डफीच्या गोलंदाजीवर २२ चेंडूंमध्ये ४० धावा करून बाद झाला. हार्दिकने आपल्या खेळीत ६ चौकार आणि १ षटकार मारला. नमन धीरला केवळ एक धाव काढता आली. शेर्फेन रदरफोर्डने स्फोटक फलंदाजी करत अवघ्या ३१ चेंडूंमध्ये नाबाद ७१ धावा केल्या, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. गोलंदाजीत, आरसीबीसाठी सुयश शर्माने दोन विकेट्स घेतल्या, तर जेकब डफीने एक विकेट घेतली.

तत्पूर्वी, फिल सॉल्ट आणि विराट कोहलीच्या सलामीच्या जोडीने आरसीबीला भक्कम सुरुवात करून दिली. या दोन फलंदाजांनी अवघ्या १०.५ षटकांत पहिल्या विकेटसाठी १२० धावा जोडल्या. सॉल्टने सहा चौकार आणि सहा षटकारांसह ३६ चेंडूंमध्ये ७८ धावांची स्फोटक खेळी केली, तर कोहलीने ३८ चेंडूंमध्ये ५० धावा करत संयमी खेळी केली.या सामन्यात विराट कोहलीने एक मोठा टप्पाही गाठला. मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलमध्ये १००० धावा पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज ठरला. शिवाय, सॉल्टसोबतच्या त्याच्या शतकी भागीदारीने टी-२० क्रिकेटमधील त्याची ४७ वी शतकी भागीदारी पूर्ण केली आणि ख्रिस गेल व बाबर आझम (दोघेही ४६) यांना मागे टाकले.

डावाची सुरुवात केल्यानंतर, कर्णधार रजत पाटीदारने डावाला आणखी गती दिली. त्याने अवघ्या २० चेंडूंमध्ये चार चौकार आणि पाच षटकारांसह ५३ धावा ठोकल्या. त्याच्या २६५ च्या स्ट्राईक रेटने सामना पूर्णपणे आरसीबीच्या बाजूने फिरवला. पण जितेश शर्मा फारसा प्रभाव पाडू शकला नाही आणि १० धावांवर बाद झाला.शेवटच्या षटकांमध्ये, टिम डेव्हिडने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या १६ चेंडूंमध्ये नाबाद ३४ धावा केल्या. त्याच्यासोबत रोमारियो शेफर्ड दोन धावांवर नाबाद राहिला. या सामन्यात मुंबईकडून ट्रेंट बोल्ट, हार्दिक पांड्या, मिचेल सँटनर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande