अकोला : मनपा शाळांमध्ये सामाजिक अंकेक्षण जनसुनावणी यशस्वी
अकोला, 15 एप्रिल (हिं.स.) : अकोला महानगरपालिका अंतर्गत 31 शाळांच्या सामाजिक अंकेक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनपा उर्दू शाळा क्र. 6 येथे जनसुनावणी उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली. मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने आणि अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने य
Photo


अकोला, 15 एप्रिल (हिं.स.) : अकोला महानगरपालिका अंतर्गत 31 शाळांच्या सामाजिक अंकेक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनपा उर्दू शाळा क्र. 6 येथे जनसुनावणी उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली.

मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने आणि अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त विजय पारतवार यांच्या अध्यक्षतेखाली या जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी सामाजिक अंकेक्षणाचे राज्य समन्वयक प्रवीण इंगळे तसेच शिक्षणाधिकारी हरीश्चंद्र इटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागरिक, पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्या सक्रिय सहभागामुळे ही जनसुनावणी अधिक प्रभावी ठरली. या वेळी शाळांमधील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सोयी-सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यात आला.

या प्रक्रियेमुळे शाळांमधील बाबी पारदर्शकपणे समोर आल्या असून, त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासनाच्या वतीने आवश्यक सुधारणा तातडीने राबविण्याचे आश्वासन देण्यात आले असून, शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत.

या उपक्रमामुळे मनपा शाळांबाबत पालकांमध्ये विश्वास वाढण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी शिक्षणाधिकारी हरीश्चंद्र इटकर, समग्र शिक्षा अभियानाचे सहायक कार्यक्रम अधिकारी हबीब शहीदी, अन्वर हुसेन तसेच समग्र शिक्षा व सोशल ऑडिट टीमने विशेष परिश्रम घेतले.

एकूणच, ही जनसुनावणी मनपा शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गुणवत्तावाढ यांना चालना देणारी ठरली असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande