
अकोला, 15 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यात वाढते तापमान, उष्मालाटेचा इशारा लक्षात घेता दक्षतेबाबत प्रभावी जनजागृती करावी, तसेच सर्व रूग्णालये, यंत्रणा सुसज्ज ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.
उष्माघात उपाययोजनांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आरती फुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.संजय सोनूने आदी यावेळी उपस्थित होते. प्रत्येक आरोग्य संस्थेत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यात शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्रा. आ. केंद्र येथे 137 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ओआरएस व औषधसाठा पुरेसा ठेवावा. त्याचप्रमाणे, नागरिकांमध्ये उष्माघातापासून दक्षता बाळगण्याबाबत प्रभावी जनजागृती करावी. ग्रामीण भागात दवंडी देऊन जनजागृती करावी महापालिका क्षेत्रात कचरा घंटागाडीमार्फत माहिती द्यावी. त्याचप्रमाणे, शहरात व जिल्ह्यात होर्डिंग्ज, सूचना, ध्वनीचित्रफीती आदींद्वारे प्रभावी जनजागृती करावी. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
कामगारांसाठी आस्थापनांनी पेयजल, कुलर आदी सुविधा ठेवाव्यात. उन्हात काम करणे टाळावे. उन्हात जास्त वेळ श्रमाची कामे करणे, कारखान्यांच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काच कारखान्यांतील कामे किंवा जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. पाच वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णाचे शरीर तापमान कमी करण्यासाठी जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत. शरीराला घाम येणे, जास्त तहान लागणे, त्वचा कोरडी पडणे, १०२ अंशांपेक्षा जास्त ताप येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, अस्वस्थता, उलटी किंवा बेशुद्धावस्था ही उष्णतेमुळे होणाऱ्या आजाराची लक्षणे आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. डॉ. मेश्राम, आर डी सी मालथने,डॉ.जावेद खान आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे