पैनगंगा कोरडीठाक; १९ कोटींची योजना अर्धवट
नांदेड, 17 एप्रिल (हिं.स.)। शासनाने १९ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. ही योजना लातूर येथील ठेकेदाराकडून राबवली जात असून, गेल्या चार वर्षांपासून काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे यंदाही शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत
पैनगंगा कोरडीठाक; १९ कोटींची योजना अर्धवट


नांदेड, 17 एप्रिल (हिं.स.)। शासनाने १९ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. ही योजना लातूर येथील ठेकेदाराकडून राबवली जात असून, गेल्या चार वर्षांपासून काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे यंदाही शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धातच उन्हाची दाहकता प्रचंड वाढली असून, तापमानात मोठी वाढ झाल्याने

नागरिक हैराण झाले आहेत. सूर्य तीव्रतेने तापत असल्याने सर्वत्र अंगाची लाही-लाही होत आहे. नैसर्गिक पाणवठ्यांचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाल्याने पाणीटंचाईची झळ अधिक तीव्रतेने जाणवत आहे. रानावनात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. तालुक्याच्या सीमेलगत वाहणारी पैनगंगा नदी पूर्णपणे कोरडी पडल्याने अनेक गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांवर गंभीर परिणाम झाला आहे.

पावसाळ्यात इसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पैनगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते. यामुळे नदीला पूर येऊन काठावरील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. मात्र, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान होते, त्यांनाच उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सध्या पैनगंगा नदी कोरडी पडल्याने अनेक गावांच्या नळ योजनांवर थेट परिणाम झाला आहे. पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची आणि पाणीटंचाई निवारणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande