
अकोला, 15 एप्रिल (हिं.स.) : रोजगाराभिमुख शिक्षण, आत्मविश्वास आणि उत्कृष्टतेचा ध्यास हीच यशाची त्रिसूत्री असून, रोजगाराच्या विविध संधी निर्माण करण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि श्रीमती मेहेरबानू विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला गुजराती समाज संस्थेचे सचिव कनुभाई सयानी होते.
या प्रसंगी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अमरावतीचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके, Tata Consultancy Services (टीसीएस) चे प्रतिनिधी राहुल पटेल, तसेच अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास समितीचे संचालक राजीव बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी मीना यांनी युवकांना कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, नामांकित कंपनी Tata Consultancy Services द्वारे पदवीधर उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली.
या रोजगार मेळाव्यात एकूण १६५ उमेदवारांनी सहभाग नोंदविला. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरला असून, स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीस चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
-----------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे