बृहन्मुंबई मनपाच्या स्थायी समिती सभागृहातच चोरी; नगरसेविका भाटिया यांच्या पर्समधून पैसे गायब
मुंबई, 15 एप्रिल (हिं.स.)। बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या स्थायी समिती सभागृहातच चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, यामुळे पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वार्ड क्रमांक ५६ मधील ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नगरसे
BMC laxmi bhatia 20 thousand stolen from corporator purse


मुंबई, 15 एप्रिल (हिं.स.)। बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या स्थायी समिती सभागृहातच चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, यामुळे पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वार्ड क्रमांक ५६ मधील ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून तब्बल २० हजार रुपये चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पालिकेच्या राजकीय वर्तुळात तसेच प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेनुसार, स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर लक्ष्मी भाटिया यांनी आपली पर्स सभागृहात ठेवून जेवणासाठी बाहेर गेल्या होत्या. मात्र परत आल्यावर त्यांच्या पर्सची चैन उघडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला छेडछाडीचा संशय आल्याने त्यांनी पर्स तपासली असता त्यातील २० हजार रुपये गायब असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे सभागृहातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

विशेष म्हणजे, महापालिकेची ‘तिजोरी’ मानल्या जाणाऱ्या या स्थायी समिती सभागृहातच असा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. लक्ष्मी भाटिया यांनी महापौर, विरोधी पक्षनेत्या तसेच स्थायी समिती अध्यक्षांकडे या प्रकरणाची तक्रार नोंदवली आहे. त्यांनी सिक्युरिटी डिपार्टमेंटच्या पोलिसांनाही याबाबत माहिती दिली आहे. मात्र, सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे चोरी कोणी केली याचा शोध लावणे कठीण ठरत आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी पालिका प्रशासनावर जोरदार टीका केली. सभागृहातच सुरक्षेची अशी अवस्था असेल, तर सामान्य मुंबईकरांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच ज्या ठिकाणी महापालिकेच्या अर्थकारणावर शिक्कामोर्तब होते, बजेट फायनल केले जाते, त्या ठिकाणीच अशा घटना घडणे ही प्रशासनासाठी नामुष्कीची बाब असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, या प्रकरणामुळे पालिका भवनातील सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande