
नांदेड, 17 एप्रिल (हिं.स.)।
उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून, कमाल तापमान ४१.९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. सकाळपासूनच सूर्याची तीव्रता वाढल्याने दुपारपर्यंत उकाड्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. दुपारी रस्त्यांवरील वर्दळही लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले.
दुपारी १२ ते ४ या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक असल्याने बांधकाम मजूर, रिक्षाचालक आणि फेरीवाले यांना सर्वाधिक फटका बसत आहे. अनेकांनी डोक्यावर कापड बांधून किंवा सावलीचा आधार घेत काम सुरू ठेवले. शहरात थंड पेयांना मोठी मागणी वाढली असून, टरबूज, खरबूज, उसाचा रस व लिंबूपाणी यांच्या विक्रीत वाढ झाली आहे. मात्र, काही ठिकाणी दरातही वाढ झाल्याचे दिसून आले. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींनी दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन केले आहे.
झाडांची संख्या जास्त असलेल्या भागात तापमान तुलनेने कमी असल्याचे दिसून आले. वाडी परिसरात ३३.५ अंश, विष्णुनगरमध्ये ३४.६ अंश, तर एमजीएम महाविद्यालय परिसरात ३३.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. झाडांची कमतरता असलेल्या भागात तापमान अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis