परभणीत नारी शक्तीचा जल्लोष; बाईक रॅली व पदयात्रेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
परभणी, 15 एप्रिल (हिं.स.)। नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ परभणी शहरात भव्य बाईक रॅली आणि पदयात्रा उत्साहात पार पडली. या उपक्रमात शहरातील विविध भागांतून महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून महिला सशक्तीकरणाचा ठसा उमटवला. या कार्यक्रम
परभणीत नारी शक्तीचा जल्लोष; बाईक रॅली व पदयात्रेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग


परभणी, 15 एप्रिल (हिं.स.)। नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ परभणी शहरात भव्य बाईक रॅली आणि पदयात्रा उत्साहात पार पडली. या उपक्रमात शहरातील विविध भागांतून महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून महिला सशक्तीकरणाचा ठसा उमटवला.

या कार्यक्रमाला जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बाईक रॅलीमध्ये महिलांनी स्वतः दुचाकी चालवत सहभाग घेतला, तर पदयात्रेत घोषणाबाजी करत त्यांनी आपल्या हक्कांसाठी एकजूट दर्शवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महिलांना विधिमंडळात ३३ टक्के आरक्षण देण्याच्या उद्देशाने नारी शक्ती वंदन विधेयक पुढे आणण्यात आले असून, महिलांना धोरणनिर्मितीत सक्रिय सहभाग मिळावा हा यामागील हेतू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शनिवार बाजार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, वसमत रोड या मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. विविध क्षेत्रातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत “महिला सशक्तीकरण”चा संदेश दिला. एकूणच, बाईक रॅली आणि पदयात्रा महिलांच्या आत्मविश्वास, एकजूट आणि सशक्तीकरणाच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरले

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande