
छत्रपती संभाजीनगर, 15 एप्रिल (हिं.स.) । छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील विद्यानिकेतन प्रवेश प्रक्रियेबाबत शासनाने महत्त्वपूर्ण बदल करत सुधारित निकष जाहीर केले आहेत. यासंदर्भात शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून प्रवेश प्रक्रियेच्या स्वरूपात बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) आधारित विद्यानिकेतन प्रवेश यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक प्रशासनात नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
पूर्वीच्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठीच्या प्रवेश परीक्षा एकत्रित घेण्याची तरतूद होती. मात्र नव्या शुद्धीपत्रकानुसार ही तरतूद वगळण्यात आल्याने आता या सर्व प्रवेश प्रक्रिया स्वतंत्रपणे पार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यापूर्वी 24 फेब्रुवारी 2003 च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला विद्यानिकेतन प्रवेशासाठी पात्रता निकष व अटी निश्चित करण्याचे अधिकार देण्यात आले होते. मात्र आता त्या तरतुदीत बदल करून संबंधित मुद्दा रद्द करण्यात आला आहे.
महाराष्ट्र स्टेट काऊन्सील ऑफ एग्झामिनेशनचे उपसचिव तुषार महाजन यांनी हे शुद्धीपत्रक जारी केले असून प्रवेश प्रक्रियेतील निकष, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रियेत सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis