
पुणे, 17 एप्रिल (हिं.स.)।
दर वर्षी 31 जुलैपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात येत असले, तरी यंदा ‘अल निनो’मुळे खडकवासला धरण साखळीतील पाणी 31 ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.
यंदा पाऊस उशिरा व पावसाचे प्रमाण कमी असल्याने उपलब्ध पाण्याचा शहर व जिल्ह्यातील एक कोटी नागरिकांना, तसेच 66 हजार हेक्टर शेतीला पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे.
धरण साखळीत 12.26 टीएमसी (42.07 टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीपेक्षा 1.30 टीएमसी अधिक पाणी धरण साखळीत आहे. असे असले तरी गतवर्षीपेक्षा यंदा उन्हाची तीवता अधिक आहे. 40 डिग््राी सेल्सिअसवर तापमान गेले आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे, दुसरीकडे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात दर तासागणिक घट सुरू आहे. ‘अल निनो’मुळे हवामान पाऊस लांबण्याची, तसेच कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आगामी साडेचार महिने पुणेकरांसह जवळपास एक कोटी नागरिकांची तहान भागविण्यासाठी जलसंपदा विभागाला कठोर उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु