
नांदेड, 17 एप्रिल, (हिं.स.)।
१३० गावांपैकी २१ गावांतून विहीर व बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव, तर ६ गावांतून ११ ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव १५ एप्रिलपर्यंत पंचायत समिती कार्यालयात प्राप्त झाले मात्र, भूवैज्ञानिकांचे आवश्यक प्रमाणपत्र (प्रपत्र 'ब') सादर न केल्यामुळे बहुतांश प्रस्ताव अपूर्ण ठरले आहेत.
परिणामी, केवळ दोन टैंकर व एक विहीर अधिग्रहण प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून, उर्वरित प्रस्ताव परत पाठविण्यात आले आहेत.
तापमानात मोठी वाढ झाली आहे. प्रखर उन्हामुळे भूजल पातळी खोल गेल्याने ग्रामीण भाग, वाडी-तांडे येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून टैंकर पुरवठा व विहीर/बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव मागविण्यात येतात. मात्र, विहीत नमुन्यात प्रस्ताव सादर न झाल्याने त्यांची छाननी करताना अडचणी येत आहेत. तालुक्यातील फुटकळवाडी सावरगाव पीर (२), सावरगाव वाडी (१), जांभळी तांडा (१), जिरगा (३) व येवती (१) अशा एकूण ११ टैंकर प्रस्ताव प्राप्त झाले होते. तसेच, २१ शेतकऱ्यांनी विहीर व बोअर अधिग्रहणासाठी प्रस्ताव सादर केले होते.
पंचायत समितीकडून तहसील कार्यालयाकडे हे प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र, भूवैज्ञानिकांचे भूजल पातळी घटल्याचे प्रमाणपत्र नसल्याने केवळ सावरगाव वाडी, फकीरातांडा व भन्यूतांडा येथे दोन टँकर मंजूर करण्यात आले. तसेच, फुटकळवाडी अंतर्गत काळू तांडा व शिरूर दबडे अंतर्गत हरिश्चंद्र तांडा येथे विहीर अधिग्रहणाचा एक प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयातून मिळाली आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis