रायगडच्या डिकसळमध्ये बेकायदा उत्खननाचा भंडाफोड
रायगड, 15 एप्रिल (हिं.स.) : कर्जत तालुक्यातील डिकसळ गावात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या बेकायदा डोंगर फोड आणि माती उत्खननाच्या प्रकारामुळे अखेर स्थानिक नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. हिंदुस्तान समाचारने 4 एप्रिल रोजी याबाबत वृत्त जारी क
diksal


रायगड, 15 एप्रिल (हिं.स.) : कर्जत तालुक्यातील डिकसळ गावात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या बेकायदा डोंगर फोड आणि माती उत्खननाच्या प्रकारामुळे अखेर स्थानिक नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. हिंदुस्तान समाचारने 4 एप्रिल रोजी याबाबत वृत्त जारी केल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करत उत्खनन बंद करण्याची कारवाई केली.

कर्जत–कल्याण राज्य मार्गालगत असलेल्या टेकडीवर दिवसाढवळ्या जेसीबी आणि इतर यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात डोंगर फोडून माती काढली जात होती. एवढा मोठा प्रकार सुरू असताना संबंधित महसूल यंत्रणा कुठे होती, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. स्थानिकांच्या मते, हा प्रकार ‘माती माफिया’च्या संरक्षणाखाली सुरू होता.

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, संबंधित जमीन मालकाची कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या जमिनीतून माती उपसली जात असल्याचा आरोप समोर आला आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सोशल मीडियावर सातत्याने तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. अखेर स्थानिक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि कर्जत तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतरच प्रशासनाने कारवाई केली, हे वास्तव अधिकच धक्कादायक मानले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असली तरी “बातमी आली म्हणून कारवाई, अन्यथा सर्व सुरळीत?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. डिकसळमधील या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande