
छत्रपती संभाजीनगर, 15 एप्रिल, (हिं.स.)। एप्रिलच्या पहिल्याच पंधरवड्यात उन्हाचा पारा वाढला. तापमान चाळिशीच्या पुढे गेले. या काळात आगी लागण्याच्या घटना वाढतात. त्यामुळेच विद्युत यंत्रणेच्या आसपास कचरा जाळणे हा समाजाच्या सुरक्षिततेशी खेळ आहे, असे स्पष्ट करत महावितरणने नागरिकांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे.
शहरी आणि ग्रामीण भागात अनेकदा विद्युत वाहिन्या, फिडर पिलर, रोहित्र (डीपी) किंवा वितरण पेट्यांजवळील मोकळ्या जागेचा वापर कचरा टाकण्यासाठी केला जातो. दुर्दैवाने आग लागल्यास घाबरून न जाता सर्वप्रथम घरातील 'मेन स्विच' बंद करावा. आग लागल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ महावितरणच्या २४ तास कार्यरत असलेल्या १९१२, १९१२०, १८००-२१२-३४३५ वा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांखालील कचरा पेटल्यास तारा वितळून खाली कोसळण्याची शक्यता असते, ज्यामुळे मोठी जीवितहानी होऊ शकते. उन्हाळ्यात एसी, कुलर आणि पंख्यांचा वापर वाढल्याने वायरिंगवर ताण येतो. नॅशनल इलेक्ट्रिक कोडनुसार घराच्या वायरिंगचे आयुष्य २० ते २५ वर्षे असते. त्यामुळे जुन्या इमारतींमधील वायरिंगची शासनमान्य परवानाधारक कंत्राटदाराकडून तपासणी करून घेणे अनिवार्य आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis