
रत्नागिरी, 15 एप्रिल, (हिं. स.) : संगमेश्वर तालुक्यातील दळणवळणाच्या गंभीर समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मतदारसंघातील दोन महत्त्वाच्या पुलांच्या बांधकामासाठी एकूण १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
कासार कोळवण येथील बावनदीवरील मोठा पूल अतिवृष्टीत वाहून गेल्याने या भागातील ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत होते. वांझोळे-कासार कोळवण-बोंड्ये या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. या पुलाच्या पुनर्रचनेसाठी ६.५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे या परिसरातील दळणवळण पुन्हा पूर्वपदावर येणार आहे. कारभाटले येथील शास्त्री नदीवर ७२ मीटर लांबीच्या पुलासाठी उर्वरित ६.५० कोटींचा निधी देण्यात आला आहे. या पुलामुळे परिसरातील अनेक गावांमधील अंतर लक्षणीय कमी होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी