रायगड जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुरवस्थेवरून वाद पेटला
माजी आमदार पंडित पाटील यांचा प्रशासनावर हल्लाबोल रायगड, 15 एप्रिल (हिं.स.) । रायगड जिल्ह्याची ओळख असलेल्या नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलाची दुरवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली असून या मुद्द्यावरून राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. माजी आमदार पंडित पाटी
Is the field for games or for counting votes?


माजी आमदार पंडित पाटील यांचा प्रशासनावर हल्लाबोल

रायगड, 15 एप्रिल (हिं.स.) । रायगड जिल्ह्याची ओळख असलेल्या नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलाची दुरवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली असून या मुद्द्यावरून राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. माजी आमदार पंडित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र टीका केली आहे.

“खेळाडू घडवण्यासाठी उभारलेले क्रीडांगण मतमोजणीसाठी वापरणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” असा आरोप पाटील यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, क्रीडा संकुलासाठी उभारण्यात आलेल्या सुविधांचा योग्य वापर होत नसल्याने कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी वाया जात आहे.

नेहुली येथील क्रीडा संकुलासाठी स्वतंत्र एमआयडीसी पाईपलाईन टाकण्यात आली होती आणि या योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री पातळीवर झाले होते. मात्र, सध्या या पाईपलाईनवर बेकायदेशीर नळजोडण्या घेतल्या गेल्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला असून मैदानाची देखभाल ठप्प झाली आहे. त्यामुळे क्रीडांगणाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

संकुलातील १२० विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे आधुनिक वसतिगृहही वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. हे वसतिगृह खेळाडूंसाठी वापरण्याऐवजी कोविड काळात तसेच निवडणूक प्रक्रियेसाठी वापरले गेल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे. परिणामी, नियमित क्रीडा उपक्रम व मोठ्या स्पर्धांचे आयोजन रखडले असून खेळाडूंना संधीच मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर त्यांनी आरसीएफ आणि गेल यांसारख्या कंपन्यांच्या सीएसआर निधीतून क्रीडा संकुलाचे आधुनिकीकरण करण्याचा पर्यायही सुचवला आहे. तसेच, मतमोजणीसाठी स्वतंत्र कायमस्वरूपी केंद्र उभारणे, बेकायदेशीर नळजोडण्या हटवून पाणीपुरवठा पूर्ववत करणे आणि विद्यमान क्रीडा सुविधांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

“आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवायचे असतील तर क्रीडा सुविधांची योग्य देखभाल आणि वापर अत्यावश्यक आहे,” असे ठाम मत पंडित पाटील यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणावर सरकार काय भूमिका घेते, याकडे आता रायगडमधील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande