
जळगाव , 15 एप्रिल (हिं.स.) गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जळगाव शहर महानगरपालिकेच्या ७ स्वीकृत नगरसेवक पदांचा पेच अखेर सुटला आहे. आज बुधवारी, १५ एप्रिल रोजी झालेल्या विशेष महासभेत सर्वपक्षीय ७ उमेदवारांची एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे ४, शिवसेना (शिंदे गट) २ आणि शिवसेना (ठाकरे गट) १ अशा सदस्यांचा समावेश आहे.विशेष महासभेचे अध्यक्षस्थान भूषविताना महापौर दीपमाला काळे यांनी नवनियुक्त स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली.
यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून डॉ. राधेश्याम चौधरी, रमेश मतानी, प्रदीप रोटे आणि सुभाष शौचे यांची निवड करण्यात आली. तसेच शिवसेना (शिंदे गट)कडून हर्षल मावळे आणि नरेंद्र आत्माराम पाटील, तर शिवसेना (ठाकरे गट)कडून महानगरप्रमुख शरद तायडे यांना संधी देण्यात आली. निवडीनंतर महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी नवनियुक्त सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. महासभेत निवडीवर शिक्कामोर्तब होताच महानगरपालिका इमारतीच्या परिसरात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यानज या निवडीनंतर आता महापालिकेत एकूण ८२ नगरसेवक झाले आहेत. यात भाजपचे संख्या ४६ वरून ५०, शिवसेनेची संख्या २५ तर शिवसेना ठाकरे गटाची संख्या ७ वर पोहोचली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर