अमरावती - शहर काँग्रेसमध्ये बंडाची ठिणगी; बबलू शेखावत यांना हटवण्याची मागणी
अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) शहर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला असून विद्यमान शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्याविरोधात नाराजीचा सूर तीव्र झाला आहे. काँग्रेसच्या ‘सृजन’ कार्यक्रमांतर्गत केंद्रीय निरीक्षक आफताब अहमद यांच्या उपस्थितीत विविध पदांसाठी
शहर काँग्रेसमध्ये बंडाची ठिणगी; अध्यक्ष बबलू शेखावत हटवण्याची जोरदार मागणी, निरीक्षकांकडे तक्रारींचा पाढा


अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) शहर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला असून विद्यमान शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्याविरोधात नाराजीचा सूर तीव्र झाला आहे. काँग्रेसच्या ‘सृजन’ कार्यक्रमांतर्गत केंद्रीय निरीक्षक आफताब अहमद यांच्या उपस्थितीत विविध पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मात्र, याच वेळी शेखावत यांना पदावरून हटवण्याची मागणी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला.

गुरुवारी झालेल्या या प्रक्रियेत शहराध्यक्ष पदासाठी अशोक डोंगरे, सलीम बेग, मेराज खा पठाण, भैय्या निचळ, पंकज मेश्राम, विजू खंडारे आणि संदेश जैन यांनी आपापले अर्ज निरीक्षकांकडे सादर केले. या स्पर्धात्मक उमेदवारीमुळे शहराध्यक्षपदावर मोठी चुरस निर्माण झाली आहे.

दरम्यान, काही काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिष्टमंडळाच्या माध्यमातून निरीक्षक आफताब अहमद यांची भेट घेत विद्यमान अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवले. शहराध्यक्ष पदासाठी असलेल्या अटींनुसार एकाच व्यक्तीला पाच वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर राहता येत नसल्याचे सांगत शेखावत यांचा कार्यकाळ संपल्याचा दावा करण्यात आला. २३ डिसेंबर २०२० रोजी त्यांनी पदभार स्वीकारला असून २०२६ पर्यंत त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांहून अधिक होत असल्याने त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी करण्यात आली.

किशोर बोरकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, “पक्षाच्या नियमांचे पालन व्हावे, यासाठी नवीन शहराध्यक्षाची नियुक्ती होणे आवश्यक आहे.” तसेच महापालिका निवडणूक आणि स्वीकृत सदस्यांच्या निवड प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोपही शिष्टमंडळाने केला. या सर्व तक्रारींमुळे शहर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे.

दरम्यान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) सदस्यपदासाठी किशोर बोरकर, प्रदेश सचिव पदासाठी समीर जवंजाळ आणि महिला जिल्हाध्यक्ष पदासाठी सुजाता झाडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे पक्षातील विविध गट सक्रिय झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.या सर्व आरोपांना उत्तर देताना शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी आपला कार्यकाळ यशस्वी ठरल्याचा दावा केला. “मी साडेचार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला असून या काळात काँग्रेसने महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळवले. लोकसभा निवडणूक जिंकण्यात यश आले, विधानसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळाले, तसेच विधानपरिषदेतही विजय मिळवला. महापालिका निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली,” असे त्यांनी सांगितले.

शहर काँग्रेसमधील या घडामोडींमुळे पक्षातील अंतर्गत राजकारण तापले असून आगामी नियुक्त्यांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निरीक्षकांच्या अहवालानंतर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande