
लातूर, 17 एप्रिल (हिं.स.)।
लातूर शहरात प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून वाहनासह सुमारे ८ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार व अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल या मार्गावरून प्रतिबंधित गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर सापळा रचून संशयित स्विफ्ट डिजायर (MH-09 CV-9124) कार ताब्यात घेतली. चौकशीदरम्यान चालकाने आपले नाव नागनाथ हरीभाऊ मुंडे (वय ४५, रा. मजगे नगर, लातूर) असे सांगितले.
वाहनाची झडती घेतली असता सीटच्या मागे व डिकीत पांढऱ्या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा आढळून आला. यामध्ये विमल पान मसाला अंदाजे ₹1,24,800, V-1 तंबाखू अंदाजे ₹31,200 तसेच कार किंमत अंदाजे ₹7,00,000 असा एकूण ₹8,56,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, 275, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, अंमलदार अर्जुन रजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे व आनंद हल्लाळे यांच्या पथकाने पार पाडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis